सोन्याच्या धुराचे ठसके

 

 

 

लहानपणी अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा वाचल्या होत्या. नुकतंच वाचलेल्या सोन्याच्या धुराचे ठसके या डॉ. उज्ज्वला दळवी यांच्या पुस्तकात अरबी देशातील सुरस आणि चमत्कारिक कथा वाचायला मिळाल्या.

 

सौदी अरेबिया या अतिश्रीमंत, पण कर्मठ इस्लामी देशाच्या अगदी साध्या, जुन्या अरबी वळणाच्या,  भटक्या बेदू अरबांच्या उम्म खद्रा नावाच्या मागासलेल्या खेड्यात पंचवीस वर्षांपूर्वी पोचलेल्या डॉक्टर दांपत्याचा हा अनुभव आहे. अगदी पहिल्या दिवसापासून अनुभवलेले धक्के आणि ठेचा डॉ. उज्ज्वला दळवींनी या पुस्तकात क्रमवार मांडलेले आहेत.

 

सौदी एअरपोर्टवर पोचल्याक्षणीच लेखिकेला तिथल्या कडव्या धर्मकारणाची कल्पना आली. एअरपोर्टवरच प्रवाशांकडे असलेल्या इतर धर्मांतील देवांचे फोटो व धार्मिक वाटणार्‍या इतर सामग्रीचं कचर्‍याच्या पेटीत विसर्जन झालं. परभाषेतील पुस्तकंदेखील संशयाने हाताळून, बरेच प्रश्नं विचारून, आक्षेपार्ह वाटणार्‍या चित्रांवर काळी शाई फासून मगच परत देण्यात आली. नंतर एकदा लेखिकेने आणलेल्या लहान मुलांच्या पुस्तकं व कॅसेट्सची देखील अगदी कसून तपासणी झाली. सौदीत एकंदरीतच धर्मपालन अत्यंत कडक. प्रार्थनांची सक्ती. व सर्वजण धार्मिक आचार-विचार कडकपणे पाळताहेत की नाही ते पाहण्यासाठी मुतव्वे नावाचे खास धार्मिक पोलिस सतत टेहळणी करत असत.

 

शरियत कायद्यातल्या, भर चौकात द्यायच्या अघोरी शिक्षा कुठल्याही सामान्य, संवेदनशील माणसाच्या अंगावर शहारे आणतात. अशीच एक शिरच्छेदाची शिक्षा चुकून (पहिल्या व बहुधा शेवटच्या वेळी) पहात असताना लेखिकेची अवस्था केविलवाणी झाली होती, पण त्याच वेळी बाजूची एक सौदी बाई मात्र आपल्या छोट्या मुलाला वर उचलून, माकडाचा खॆळ दाखवावा त्याप्रमाणे कौतुकाने तो सारा प्रकार दाखवत होती व हे काय चाललंय, का चाललंय, कसं चाललंय त्याचं वर्णनही करून सांगत होती.

 

सौदीतील भोजनाची पध्दत व खाण्याचे पदार्थ यांनीसुध्दा लेखिकेला ठसका लावला. मसाले, अंडी, सुका मेवा भरून शिजवलेला, शिंगं-डोळ्यांसकटचा मेंढा मध्यावर ठेवून सगळ्यांनी तो एकाच ताटातून, उष्ट्या हातांनी ओरबाडून खाणं, यजमानाने उष्टा घास पाहुण्याकडे टाकणं, हा त्या पाहुण्याचा बहुमान समजलं जाणं व पाहुण्याने तो खायचा नाकारला तर यजमानाचा अपमान होणं हे तिथले प्रचलित शिष्टाचार आपल्या आकलनापलिकडचे आहेत. टोळ उकडून खाणं, हवं तेव्हा शिजवून खा म्हणत मांसाचा तुकडा किंवा जिवंत घोरपड, कोकरू भेट म्हणून देणं हे परदेशी मांसाहार्‍यांच्याही गळी उतरत नाही तर शाकाहारी माणसाचे काय हाल होत असतील ?

 

पंचवीस वर्षांपूर्वी या डॉक्टर दांपत्याला बाकीही बर्‍याच गैरसोईंना तोंड द्यावं लागलं. सौदीतल्या खेड्यातून फोन किंवा टपालाची सोय आताइतकी सुलभ नव्हती. ज्यांना घरी पैसे पाठवायचे असत त्यांनाही त्यासाठी काय काय दिव्यांतून जावे लागे ! कधी कधी हवाल्यासारख्या बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागे. त्यात अर्धशिक्षित, कष्टकरी परदेशी लोकांच्या हालाला तर पारावार नसे. त्या लोकांच्या समस्याही लेखिकेने शोषितांचे अंतरंग या प्रकरणात मांडल्या आहेत. त्यात सौदीतला भारतावरही मात करेल असा अनागोंदी कारभार ! वाळवंटातून फिरणं हे आणखी एक दिव्य. आणि लेखिकेला गर्भवती असतानादेखील त्याला सामोरं जावं लागलं.

 

डॉक्टर्सना खरंतर कुठल्याही समाजात मान मिळतो. पण सौदी लोक मुळात मग्रूर. आपल्या सरकारने भरपूर पैसे देऊन हे डॉक्टर्स आपल्या सेवेसाठी इथे आणले आहेत ही त्यांची भावना. त्यात स्त्री डॉक्टरने पुरुष सौदी रुग्णाला आज्ञा तर सोडाच, सूचनासुध्दा द्यायच्या नाहीत. त्रयस्थपणे सांगायचं, "रक्तातली साखर वाढलेली आहे. ती मधुमेह आहे असं सांगते. गोळ्यांनी आणि इन्शुलिनच्या इंजेक्शनांनी ही साखर कमी होते. गोड खाल्लं नाही तर ही साखर कमी व्हायला मदत होते. त्यामुळे फायदा होतो." सतत हे भान ठेवणं म्हणजे तारेवरची कसरतच ! पण हळूहळू बायका तर लेखिकेशी जिव्हाळ्याने वागू लागल्याच, पण पुरुषही लेखिकेला कनिष्ठ दर्जाचा पुरुष मानू लागले !

 

या देशातील व कदाचित एकंदरीतच कर्मठ मुस्लिम समाजातील स्त्रियांची परिस्थिती जावे तिच्या वंशा या प्रकरणात वाचायला मिळते. स्त्रियांनाच नव्हे, तर लहान मुलींना देखील समाजात दुय्यम स्थान. लेखिकेच्या भाषेत, शेळीपेक्षा थोडं वरचं, पण उंटापेक्षा थोडं खालचं. त्यांनी घरकाम करायचं, स्वयंपाक करायचा, पण घरातल्या पुरुषांनी, अगदी पुरुष नोकरांनी सुध्दा जेवून झाल्यानंतरच स्त्रियांनी व मुलींनी उरलेल्या उष्ट्या जेवणावर भागवून घ्यायचं. (अर्थात ही परिस्थिती भारतातदेखील काही समाजांत व इतरही काही इस्लामेतर आशियाई देशांत आढळते.) मुलगी दहा वर्षांची झाली की बुरखा घालायचा, पुरुष पाठीराख्याशिवाय बाहेर जायचं नाही. -९ वर्षांचा छोटा मुलगा देखील आपल्या आईला, बुरखा घातल्याशिवाय बाहेर पडायचं नाही असं बजावतो. बायकांना गाडी चालवायला परवानगी नाही. हल्ली जुबैलसारख्या मोठ्या व जरा आधुनिक शहरात काही बायका नोकरी करतात त्या बहुधा डॉक्टर, नर्स, हॉस्पिटलात कारकून किंवा शिक्षिका म्हणून. तरीही त्यांनादेखील गाडी चालवायला परवानगी नाही.

 

पुरुषांना बहुपत्नीत्वाची परवानगी. त्यात प्रौढ-बाला विवाहदेखील सर्रास होतात. लेखिका, तिचे यजमान व त्यांची चौदा वर्षांची मुलगी समुद्रावर फिरायला गेले असताना त्यांच्या ओळखीचंच एक अरबी कुटुंब भेटलं. गप्पाटप्पा, खजूर खाणं, कॉफीपान करता करता लेखिकेच्या यजमानांच्या वयाच्या त्या अरबी कुटुंबप्रमुखाने लेखिकेच्या मुलीला स्वत:साठी मागणी घातली व आपलीही साधारण त्याच वयाची मुलगी लेखिकेच्या यजमानांना द्वितीय पत्नी म्हणून देऊ केली. डॉ. श्री. दळवींनी समयसूचकता दाखवून तो प्रसंग व्यवस्थित निभावून नेला. पण लेखिका म्हणते की दोन बेदू कुटुंबांमध्ये त्या बैठकीत दोन्ही लग्नं विनासायास ठरून गेली असती.

 

मूल होऊ न शकणार्‍या स्त्रीला या समाजात अजिबात स्थान नाही. तिला तलाक देणं हे कायद्याला धरूनच असतं. शिवाय बरीच वर्षं सतत बरीच मुलं होणं हा त्यांच्या स्त्रीत्वाचा केविलवाणा पुरावा असतो. त्यामुळे अजिबात मूल नसलेल्या स्त्रिया तर हवालदिल होऊन उपचारांसाठी डॉ. दळवींकडे यायच्याच (ते कुठल्याही स्त्रीच्या बाबतीत साहजिक आहे), पण अकरा मुलं असलेली एक स्त्रीदेखील सगळ्यात धाकट्या मुलानंतर दीड वर्ष झालं तरी पुढच्या बाळाची चाहूल लागत नाही म्हणून तपासून घ्यायला आली होती !

 

काही स्त्रिया घरच्या कामाला किंवा म्हातार्‍या नवर्‍याला किंवा घरातील इतर जाचाला कंटाळून मुद्दाम दुखणी ओढवून घेऊन हॉस्पिटलात भरती व्हायच्या. म्हणजे घरापेक्षा हॉस्पिटल परवडलं अशी त्यांची परिस्थिती ! तर एक खरोखरीची रुग्ण स्त्री हॉस्पिटलमध्ये भरती व्हायला तयार नव्हती कारण तिच्या गैरहजेरीत तिचा नवरा त्यांच्या मोलकरणीशी जवळीक करायचा !

 

आपल्याला थक्क करणारे असे नानाविध अनुभव डॉ. दळवींनी ह्या पुस्तकात कथन केले आहेत. ह्यांतले काही अनुभव त्यांना स्त्री असल्यामुळे आले आहेत, काही डॉक्टर असल्यामुळे, तर काही स्त्री डॉक्टर असल्यामुळे. काही अनुभव आर्थिक बाबतीतले आहेत, तर काही सामाजिक. काही अनुभव मुस्लिमेतरांच्या दृष्टीकोनातून आहेत, तर काही कुठल्याही व्यक्तीला येतील असे.

 

लेखिकेने वैतागून जाऊन उच्चारलेल्या आवशीचो घो या मालवणी शब्दांमुळे आपलेपणा वाटून रियाधच्या हॉस्पिटलमधल्या एका मालवणी डॉक्टरने तात्काळ वैद्यकीय मदत पाठवणं, भर निर्जन वाळवंटात एका फिलिपिनो नर्सने टॉयलेटला जाण्यासाठी वापरलेले भलतेच पर्यायी शब्द ऐकून लेखिकेचं चक्रावून जाणं, अरबी भाषा शिकताना व पेशंट्सबरोबर ती बोलताना कधी कधी होणारे मजेशीर गैरसमज असे हलकेफुलेके अनुभवदेखील आहेत. एकंदरित लेखन प्रसन्न व मिश्किल असलं तरी त्याला कारुण्याची झालर लावणारे काही हृदयद्रावक प्रसंगदेखील आहेत.

 

मुस्लिमांच्या बाबतीतले सकारात्मक अनुभव देखील लेखिकेने सांगितले आहेत. पहिला पगार हाती मिळायला थोडा विलंब झालेला असताना तोपर्यंतच्या आर्थिक टंचाईच्या काळात भारतीय व इतर देशांच्या डॉक्टर्सप्रमाणे, पाकिस्तानी व बांगलादेशी डॉक्टर्सनी देखील या दांपत्याला उदारपणे आर्थिक मदत देऊ केली. संत तुकाराम व संत एकनाथांचे अरबी अवतारदेखील त्यांना पहायला मिळाले. अजान ही मुस्लिम प्रार्थनेची हाक. एकदा ती हाक ऐकताना लेखिकेला मनात निर्गुण निराकाराचं अस्तित्व भरून टाकणारी एक धर्मातीत अशी अलौकिक भावना जाणवली. बुरखा उर्फ अबायाच्या बाबतीत तर लेखिकेचा दृष्टीकोन बराच सकारात्मक आहे. पर्दाफाश या प्रकरणात वाळवंटातील अरबी बायकांनी बुरखा वापरण्याची पटण्याजोगी संभाव्य कारणंदेखील दिलेली आहेत. शरियत कायद्यातील काही गुन्ह्यांबाबतीतच्या अघोरी शिक्षांचीदेखील संभाव्य कारणं दिलेली आहेत.

 

डॉ. दळवींनी ह्या पुस्तकात असे अनेकविध विषय हाताळलेले आहेत. चांगल्या-वाईट अनुभवांच्या बाबतीत त्यांनी समतोल साधून लिखाण केलेलं आहे. कुठल्याही बाबतीत त्यांची दृष्टी पूर्वग्रहदूषित वाटत नाही. तटस्थपणे त्यांनी आपली मतं मांडलेली आहेत. सौदी अरेबिया या आपल्या कर्मभूमीबद्दल त्यांच्या मनात कृतज्ञता आहे व उम्म खद्रा या पहिल्या वास्तव्याच्या ठिकाणाबद्दल एक भावनिक ओढ व आपुलकी.

 

डॉ. दळवीच म्हणतात, "सौदी अरेबियातल्या, गेल्या पाव शतकातल्या आमच्या जीवनप्रवासाचे हे वेचे आहेत. पण हे प्रवासवर्णन नाही की आत्मकथन नाही. सौदी अरेबियाची सांगोपांग माहिती देण्याचा आवही आणलेला नाही. पंचवीस वर्षं त्या देशात रहात असताना आमच्या मध्यमवर्गीय मराठी मनात जे जे काही प्रकर्षाने वेगळं म्हणून ठसलं किंवा ठसठसलं ते या ठसक्यांमधून मांडलं आहे."

 

डॉ. दळवींची लेखनशैली व भाषेवरची पकड अंतराळच्या वाचकांना परिचित आहेच. मुळातच लोकविलक्षण असलेले हे अनुभव व किस्से डॉ. दळवींच्या खुमासदार व सहजसुंदर लेखनशैलीमुळे अधिकच वाचनीय वाटतात, आपली उत्कंठा वाढवतात व त्यामुळे एकदा हे पुस्तक वाचायला सुरू केलं की संपेपर्यंत ते खाली ठेववत नाही.

 

सौदी अरेबियातून निघणार्‍या सोन्याच्या धुराबद्दल आपण नेहमीच ऐकतो (लेखिकेनेही सोन्याच्या दुकानाचं केलेलं नुसतं वर्णनसुध्दा डोळे दिपवणारं आहे), पण ह्या धुराच्या ठसक्यांबद्दलची माहिती देणारं हे अप्रतिम पुस्तक सर्वांनी वाचलंच पाहिजे.

 

 

- नीता नाबर